भारतात कोरोनाचा विळखा: 

     जगभरात सध्या कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोनासारखा जीवघेणा आजार ने देशात प्रवेश केला. रोज हजारोने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. जनसंपर्कातून संसर्ग होत असल्याने संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. कारण कोरोनाला प्रतिबंध करण्याचा या शिवाय दुसरा मार्ग नव्हता. 

 

लोकडाऊनचा दुषपरिणाम:

     लोकडाऊनमुळे लोक घरात बंदिस्त झाल्याने यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, दुकाने, उद्योगधंदे, दळणवळण इ. सारं काही बंद झाले. त्याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. लोकांचे रोजगार गेले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार निम्यावर आले एकूणच नागरिकांची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर ढासळली. या काळात सोने वगळताआधार वाटणारे गुंतवणुकीचे सर्व पर्याय निरुपयोगी ठरले. शेअर बाजार कोसळला, रिअल इस्टीटचे व्यवहार थंडावले, बँकांच्या व्याजदरात घट झाली. याला अपवाद होता फक्त सोन्याचा. सोन्याचे भाव वाढले. त्यामुळे अडचणींच्या काळात घरातील सोने, अनेकांच्या उपयोगी ठरले. 

 

सोन्याची झळाळी वाढली:   

   सोन्याच्या भावाने या काळात उचांक गाठला. त्यामुळे लोकांनी सोने तारण ठेऊन अथवा विक्री करून सोन्याचे रूपांतर पैशात करून घेतले. सोन्याच्या वाढत्या  भावामुळे नागरिकांना चांगला परतावा मिळाला. सोन्याचे महत्व, विश्वासाहर्ता, सुरक्षितता, मूल्य, तरलता हे सार काही पुन्हा एकदा अधोरलिखित झालं. त्यामुळे आजकाल भाव वाढलेले असूनही सोन्यात गुंतवणुकीकडे लोकांचे कल दिवसेंदिवस वाढतो आहे.  

 

सोन्याची गुंतवणूक उत्तम कशी ?

गुंतवणूक कोणतीही असो; त्याची कसोटी तीन गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे, परतावा (रिटर्न्स), जोखीम (रिस्क) आणि कालावधी(पिरियड). शेअर, म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक धोका पत्करला लावणारी आहे. या पार्शवभूमीवर सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. यासाठी काही मुद्दे विचारात घेता येतील. 

 • केव्हाही सुरक्षित गुंतवणूक. नफा थोडाफार कमी अधिक मिळाला तरी नुकसान, तोटा काहीच नाही. म्हणून सोन्याला केव्हाही अधिक मागणी असते.
 • कच्चे तेल, डॉलर, बँक यांच्यापेक्षा सोन्याकडे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून पहिले जात आहे.
 • जेव्हा जगात काही अनपेक्षित गोष्टी घडतात, संकटे येतात तेव्हा लगेच शेअर बाजार कोसळतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. सोने तेजीत येते. म्हणून त्याला 'सेफ हेवन' मालमत्ता असेही म्हणतात.
 • 'महागाई हेज' म्हणून सोने ओळखले जाते. जशी महागाई वाढते तसे सोन्याचे भावही वाढतात. त्यामुळे आजच्या भावाने खरेदी केलेले सोने उद्याच्या चलन मूल्यावर विकू शकता. म्हणजे चलन अवमूल्यनाचे नुकसान भरून निघते.
 • महागाईच्या काळात सोनं ही रोख रकमेपेक्षा अधिक स्थिर गुंतवणूक आहे.
 • आंतराष्ट्रीय पातळीवर सोन्याला कायमच मागणी असते त्यामुळे ग्राहक व किंमत दोन्ही केव्हाही मिळते.
 • गेल्या दहा वर्षांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत.
 • दीर्घ कालावधीत खूप उच्च उत्पन्न मिळण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा विशिष्ट अल्प कालावधीत, उत्कृष्ट परतावा देणारी ही गुंतवणूक आहे.
 • मूल्यवान मालमत्ता असलेल्या सोन्याने त्याचे मूल्य कायम राखल्याने अतिशय स्थिर परत्याव्यासह ही एक स्थिर गुंतवणूक म्हणून ओळखली जाते.

  सोन्यात गुंतवणुकीचे विविध मार्ग :

  सोन्यात गुंतवणूक करण्याचे बरेच मार्ग आहेत. प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहेत. आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार प्रत्येकाला योग्य पर्यायाची निवड करता येऊ शकते.

  सोनं चलनीकरण योजना:

  आपल्याकडील सोने बँकेत जमा करून त्याची वजनानुसार एफडी बनवायची. आपल्याला हव्या त्या कालावधीची मुदतीनंतर तेव्हा सोन्याचा जो भाव असेल त्यानुसार पैसे अथवा सोने परत केले जाते. यात दागिने परत मिळत नाही त्याऐवजी सोने मिळते. 

  डिजिटल सोने:
  यात सोन घेणाऱ्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होत जाते आणि जेव्हा प्रत्यक्ष सोने हातात हवे असते तेव्हा मजुरी खर्च घेऊन सोने घरपोच दिले जाते. सोन्याचा दर थोडा कमी असतो आणि फक्त 24 कॅरेट सोनेच घेता येते. 

  प्रत्यक्षात सोने खरेदी:
  यात वेढे, कॉइन, बार, बिस्किट रूपाने चोवीस कॅरेट सोने खरेदी करतात. पुढे गरजेच्या वेळी दागिने करतानाही याचा उपयोग होतो. ही संपत्तीतील प्रत्यक्ष वाढ आपल्या बजेटनुसार केव्हाही पैसे गुंतवण्याचा सर्वात सोपा सुरक्षित व फायदेशीर मार्ग. 

  सुवर्ण संचय योजना:
  आपल्या नेहमीच्या सराफाकडे वर्षभर दरमहा ठराविक रक्कम भरायची. वर्षानंतर शेवटी एक महिन्याचा बोनस मिळून जी रक्कम जमा होईल त्या रकमेचे सोने घ्यायचे दरमहा थोड्या बचतीतून सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे

  सोने दागिने रुपात खरेदी:
  सोन्याचे दागिने खरेदी करण्यात दोन फायदे आहेत. एक गुंतवणूक होते आणि दुसरा दागिने वापरण्याची हौस होते.

   


  सोन्याच्या दागिन्यांचे महत्व:

  आपल्याकडे लग्न कार्यात विशेष प्रसंगात दागिन्यांचे फार महत्त्व आहे. दागिना हे स्त्रीधन मानतात आणि हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते.  ही परंपरा प्रत्येक जण आपल्या परीने जपतात. दसरा दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया तसेच गुरुपुष्यामृत योग यासारख्या सुमुहूर्तावर सोनेखरेदी करून टाकली जाते. काळानुरूप बदललेल्या फॅशन नुसार नवे दागिन्यांची हौसही यामुळे पूर्ण करता येते.  आज-काल बिनघटीच्या दागिन्यांमुळे हा पर्याय अधिकच लोकप्रिय झाला. दागिना हा स्त्रीचा आवडीचा, हौसेचा, प्रतिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा भाग समजला जातो. ही स्त्रीची वैयक्तिक संपत्ती असल्याने कुटुंबाला कधी आर्थिक अडचण आली तरी आपली हीच संपत्ती तेव्हा उपयोगी पडेल हा आत्मविश्वास तिच्या मनात असतो.  म्हणून दागिन्याची हौस आणि बचतीतून केलेली गुंतवणूक अशा दोन्ही अर्थाने सोन्याच्या दागिन्यांकडे पाहिले जाते. 

   

   

  गोल्ड लोन / सोन्याच्या कर्जाचे फायदे:

  गरजेला उपयोगी पडते तेव्हा गुंतवणुकीचे खऱ्या अर्थाने सोने होते. आर्थिक अडचणीच्या वेळी बँक कर्जाच्या विविध प्रकारातील सर्वात सोपा, सुलभ व तत्पर मार्ग म्हणजे गोल्ड लोन.  केवळ आधार कार्ड दाखवून सोन्यावर कर्ज मिळू शकते.  या कर्जावरील व्याजदर ही इतर गरजेच्या तुलनेत कमी असतात सोने कर्ज घेतेवेळी तुमची कुठल्याही प्रकारे बँक हिस्ट्री पाहिली जात नाही. हे कर्ज कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी न आकारता तात्काळ मिळू शकते.  यात तुम्हाला इन्कम प्रूफही दाखवण्याची गरज नाही. दरमहा केवळ व्याजाची रक्कम देऊन आणि पाहिजे त्या वेळेस मुद्दलाची रक्कम चुकती करून आपले तारण ठेवलेले सोने परत मिळवू शकता. लॉकडाउनच्या काळात या सोने कर्जाने किती कुटुंबांचे घर सावरले आहे.