येत्या काळातील लग्नाचे मुहूर्त नजरेसमोर ठेवून दाक्षिणात्य ‘टेम्पल ज्वेलरी’ हे दागिन्याचे प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांपलीकडच्या या सोन्याच्या दागिन्यांची क्रेझ वाढत आहे.

दागिन्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ असते मंगळसूत्र आणि पाटल्यांची. विशेषतः आता डिसेंबर-जानेवारी दरम्यान येणाऱ्या मुहूर्तांच्या वेळी तर दागिन्यांची विशेष खरेदी होते. अगदी अलीकडेपर्यंत नाजूक पद्धतीची मंगळसूत्रं आणि दागिन्यांसाठी ग्राहकांची मागणी असायची. आता मात्र पूर्वीच्या मंदिरांतून किंवा राजे - महाराजांच्या काळातील वापरत असलेल्या मोठ्या आकाराच्या दागिन्यांची क्रेझ वाढताना दिसते आहे. यालाच ‘दाक्षिणात्य टेम्पल ज्वेलरी’ म्हणतात. खास दाक्षिणात्य पद्धतीचे हे दागिने भरजरी प्रकारचे आहेत. प्राचीन परंपरा आणि आधुनिकता यांचा आगळा संगम यांद्वारे दिसून येतो. याच टेम्पल दागिन्यांचे झुमके आणखीनच आकर्षक दिसतात. त्यामुळे लग्नातील काही वैशिष्ट्यपूर्ण साड्यांवर त्याची हमखास मागणी केली जाते. त्यात सोन्यासोबतच विशिष्ट रंगांचे खडेदेखील असल्याने ते अधिकच आकर्षक दिसतात.

सध्या ठसठशीत दिसण्याच्या दृष्टीने ‘टेम्पल ज्वेलरी’ आवर्जून खरेदी केली जाते.
टेंपल ज्वेलरी हा एव्हरग्रीन ज्वेलरी ट्रेंड (evergreen jewellery trend) आहे. पारंपरिक (traditional) गेटअप आणि टीव्ही सिरियल्सच्या शूटिंगमध्येसुद्धा आता टेंपल ज्वेलरीला प्राधान्य देण्यात येतं. तसंच, टेंपल ज्वेलरीच्या मोटिफ्स (motifs) मध्ये देवी - देवता आणि नैसर्गिक गोष्टींना जास्त प्राधान्य देण्यात येतं. साधारणतः नववधू अशा तऱ्हेचे हार, बिंदी, मंगळसूत्र, बांगड्या आणि कानफूल घालण्यास पसंती देतात. टेम्पल ज्वेलरी अँटिक दिसण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर खास प्रक्रिया करून त्यावर लालसर रंग आणला जातो. त्यामुळे पारंपारिक दागिन्यांपेक्षा टेम्पल ज्वेलरी वेगळी दिसते.
