दागिन्यांची मजुरी जास्त का वाटते ?
दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून धातू जातो आणि मग दागिना घडतो. काही दागिने साच्यातून दाब देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर ठसा उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. दागिने घडवताना सोन्याचा वापर अधिक होतो. तसेच बांगड्या, अंगठ्या हे प्रकार मुशीत धातू ओतूनही तयार केले जातात. धातूवर नक्षीकाम तयार करणे ही एक कला आहे. यासाठी पूर्वी पारंपरिकरित्या प्रशिक्षित कारागीर असत. परंतु नवीन तंत्रज्ञानुसार आता हे काम संगणकावरही केले जाते. त्यासाठी कॅड (CAD) कॉम्प्युटरएडेड डिझायनिंग या संगणक प्रणालीद्वारा दागिन्यांच्या नक्षीचे काम केले जाते. ही बनवलेली नक्षी कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग मशिनमध्ये फीड करून त्यातून एक प्रतिकृती बनवली जाते. ही काहीवेळा मेणातही बनवली जाते. त्यात योग्य त्या सुधारणा करून मग दागिना घडवला जातो.
मजुरी ग्राहकाकडून का घेतली जाते ?
सोन्याचा भाव हा सोने खरेदी आणि आणनावळ खर्चासह वाजवी नफा गृहीत धरून ठरवलेला असतो. हा भाव फक्त सोन्याचा असतो. सोन्याचे दागिने बनवताना ते कारागिराकडून बनवून घ्यावे लागतात. हे दागिने बनवितांना कारागिराने त्याचे कौशल्य वापरलेले असते. या कौशल्याची किंमत किंवा मोबदला कारागिरास दयावा लागतो. म्हणून मजुरी ग्राहकांकडूनच घेतली जाते.
चोख सोन्यापेक्षा सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक का करावी ?
दागदागिने हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. सणासुदीला घरातील मुली, सुनांसाठी स्त्रीधन म्हणजेच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आवर्जून केली जाते. सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. शुभ मुहूर्त साधण्यासाठी दरवर्षी शुभ मुहूर्ताना मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. सोन्याचे दागिने आपल्या सौंदर्यांमध्ये नक्कीच अधिक भर घालत असतात. चोख सोन्यापेक्षा दागिने घेतल्यावर हौसही होते आणि सोन्यात गुंतवणूकही होते. तसेच घरातील स्त्रीचे दागिन्यांसोबत एक नाते जोडले जाते जेव्हा आपण दागिने परिधान करतो तेव्हा प्रत्येक वेळी त्या दागिन्यासोबत असलेले नाते, क्षण आठवते आणि ते नाते आणखी घट्ट होते. म्हणून दागिने हे जास्तीत जास्त दिवस जपले जातात. बाजारभानुसार बघितले तर याचा फायदा चांगलाच होतो. जसे दिवसेंदिवस वाढत असलेल्या सोन्याच्या भावानुसार दागिन्यांचा भविष्यात चांगला परतावा येतो.